नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल...
यंदाच्या हंगामात सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला आहे. त्यामुळे सर्वच चार एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. सध्या पिके जाेमदार आहेत. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. - अण्णा महामुनी
हायब्रीड ज्वारीला ९०० तर रबी ज्वारीला १ हजार ७०० रुपयांचा भाव आहे. त्यामुळे पेरणी करण्यापेक्षा विकतची ज्वारी परवडते. परिणामी, यंदा पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. सोयाबीनला सर्वाधिक भाव असल्याने ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. - बालाजी जाधव
सोयाबीनचा सर्वाधिक पेरा...
जिल्ह्यात ६ लाख १५ हजार क्षेत्र आहे. त्यापैकी ५ लाख ८१ हजार ४४३ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक ४ लाख ५६ हजार ६७८ हेक्टरवर पेरा झाला आहे. सोयाबीनला उच्चांकी दर असल्याने पेरणी क्षेत्रात वाढ झाली असल्याचे जिल्हा कृषि विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
खरीपातील पिकांना पावसाची प्रतीक्षा...
जिल्ह्यात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे खरीपातील पिके बहरली होती. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. दोन ते तीन दिवसात पाऊस न झाल्यास खरीपातील पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.