वलांडी : देवणी तालुक्यातील चवणहिप्परगा येथील
एका शेतकऱ्याने शेतीत नवा प्रयोग करत ड्रॅगनफ्रुट फळबागेची लागवड केली आहे. सध्या ही बाग बहरली असून बाजारपेठेत या फळास २०० रुपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे. त्यामुळे तालुकाभर या शेतकऱ्याची चर्चा होत आहे.
देवणी हा तालुका कर्नाटक सीमेलगत आहे. या भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांनी ऊस, केळी, पपई या पिकांशिवाय अन्य प्रयोग केले नाहीत. दरम्यान, चवणहिप्परगा येथील भरत ज्ञानोबा भट यांनी शेतीत नवा प्रयोग केला आहे. त्यांना ९ एकर शेती असून पारंपरिक पिकांबरोबर त्यांनी अर्धा एकर क्षेत्रावर ड्रॅगनफ्रुटची लागवड केली.
जुलै २०१९ मध्ये गुजरातहून ३० रुपयांना एक याप्रमाणे ८०० रोपांची खरेदी केली. अर्धा एकरवर दोनशे खांब रोवून प्रत्येक खांबाच्या चारही बाजूंनी प्रत्येकी एक याप्रमाणे रोपांची लागवड केली. त्यानंतर अतिशय कमी खताची मात्रा देत वेळोवेळी मशागत केली. सध्या ही बाग बहरली असून फळ तोडणीचा हंगाम सुरू आहे. आतापर्यंत ५ क्विंटल फळाची विक्री केली असून २०० रुपये किलोप्रमाणे स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे.
कुटुंबीयांनी पाठबळ दिले...
शेतीत सध्या मजुरांची समस्या सर्वाधिक आहे. शिवाय, पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मित्रांच्या मदतीने परदेशी फळाची लागवड करण्याचे धाडस केले. सुरुवातीला या निर्णयावर फेरविचार करण्याचा सल्ला दिला. मात्र, कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे लागवड केली. आता यावर्षी नव्याने अर्धा एकरवर लागवड सुरू केली आहे. एकरी चार लाखांपर्यंतचे उत्पादन निघते.
- भरत भट, चवणहिप्परगा.
शेतकऱ्यांची पाहणीसाठी गर्दी...
ड्रगनफ्रुटची सीमावर्ती भागात पहिलीच शेती. न पाहिलेल्या फळाची शेती पाहण्यासाठी तालुक्यातील शेतकरी गर्दी करीत आहेत. उदगीरसह स्थानिक बाजारपेठ, शेती पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या खरेदीमुळे बहुतांश विक्री स्थानिकलाच झाली आहे.
ऑक्टोबरपर्यंत काढणी राहणार...
५ जुलै २०१९ रोजी लागवड केली. २०२० मध्ये पाच क्विंटलचे उत्पादन निघाले. चालू हंगामात आतापर्यंत पाच क्विंटलचे उत्पादन घेतले आहे. काढणी ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. आणखीन १० क्विंटल माल निघण्याची अपेक्षा आहे. सरासरी अर्धा एकरातून तीन लाखांचा नफा होण्याची अपेक्षा आहे, असे भट यांनी सांगितले.