जळकोट (लातूर) : तालुक्यातील पाटोदा खुर्द पाटी येथील वळण रस्त्यावर सोमवारी रात्री दुचाकीचा अपघात झाला. या अपघात दुचाकीवरील बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जळकोट पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, सोमवारी रात्री उदगीरहून नांदेडकडे जात असताना पाटोदा खुर्द पाटीजवळ एमएच २६ एवाय ८२२६ या क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात झाला. यात बालाजी किशन रासवणे (वय ४५ रा. फुलवळ ता. कंधार, जि. नांदेड) व राजश्री श्रीमंगले (वय २२ रा. उदगीर) हे दोघे वळण रस्त्यावरील दरीत पडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनेबाबत जळकोट पोलिसांना कळविले.
माहिती मिळताच पोलीस जमादार प्रकाश चिमणधरे, राहुल वंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील मृतांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथेच मयत दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आला. याप्रकरणी जळकोट पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश चिमणदरे करीत आहेत.