लातूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांचे वडिल तथा लातूर शहरातील नामांकित विधिज्ञ हरिश्चंद्र विठ्ठलराव रेड्डी - पाटील यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९६ वर्षे होते. दरम्यान, हरिश्चंद्र रेड्डी- पाटील यांच्या पार्थिवावर लातूर येथील मारवाडी स्मशानभूमित सायंकाळी ५.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लातूर आणि मराठवाड्यातील प्रसिद्घ विधीज्ञ म्हणून हरिश्चंद्र रेड्डी सर्वांना परिचित होते. लातूर शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. वकिली व्यवसायात येणाऱ्या तरुणांसाठी हरिश्चंद्र रेड्डी हे मार्गदर्शन केंद्रच होते. त्यांच्या कार्यालयात तरुण तसेच ज्येष्ठ वकिलांची वर्दळ असे. त्यांच्या पश्चात मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील, दिनेश पाटील आणि विरेश पाटील असे तीन मुले आहेत.