आशपाक पठाण, लातूर : मुलीला अहमदपूर येथील वसतिगृहात शिक्षणासाठी दुचाकीवर सोडायला निघालेल्या वडिलाचा पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यात मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रात्री नोंद करण्यात आली आहे.
लातूर शहरातील स्वामी विवेकानंद चौकातून गरूड चौकाकडे जात असताना हा अपघात झाला आहे. ट्रक क्र. एमएच १२ पीक्यू २४६४ ने पाठीमागून दुचाकी क्र. एमएच २४ झेड २८४६ ला जोराची धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील सुनिल राजेंद्र पाटील (वय ४४, रा. वानेवाडी किल्लारी, ता. औसा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगी पायल सुनिल पाटील (वय १७) ही जखमी झाली आहे. तिच्यावर लातूरच्या एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पायल ही अहमदपूर येथे अकरावीच्या वर्गात शिकत असल्याची माहिती आहे. अपघातातील दोन्ही वाहने विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत. याप्रकरणी नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.