लातूर : मुलीला नांदविण्याच्या कारणावरुन विवाहितेच्या सासऱ्याचा खून केल्याप्रकरणी लातूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.बी. राेटे यांनी शुक्रवारी दाेषी आराेपीला जन्मठेप व एक हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली.
सहायक सरकारी वकिल व्ही.व्ही. देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी संदिपान शिंदे (वय ३५ रा. ढाेकी-येळी ता.जि. लातूर) यांनी गातेगाव ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रशांत शिंदे यांचे लग्न खंडाळा (ता. लातूर) येथील पल्लवी हिच्याशी झाले हाेते. दरम्यान, पल्लवी भांडण करुन माहेरी गेली हाेती. याबाबत लातूर न्यायालयात दावे दाखल हाेते. लातूर न्यायालयातील कामकाज आटाेपून प्रशांत शिंदे हे गावाकडे निघाले हाेते. सुरेश झाडके, पल्लवी यांनी प्रशांत यांना अडविले. तुझ्या कुटुंबाला खल्लास करताे, अशी धमकी दिली.
२६ एप्रिल २०१८ राेजी सुरेश झाडके, पल्लवी, समाधान शिंदे याच्यासह इतर गाड्यातून घरी आले. त्यांनी घरात घुसून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संदिपान मारोती शिंदे (वय ६०) भांडणात मध्यस्थी करताना समाधान भास्कर शिंदे याने त्यांच्या डाेक्यात माेठे लाकूड घातले. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात संदीपान शिंदे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळा (ता. लातूर) येथे उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी लातुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान संदीपान शिंदे यांचा मृत्यू झाला.
याबाबत गातेगाव ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पाेलिस निरीक्षक एस.ए. चव्हाण यांनी करुन न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकिल व्ही.व्ही. देशपांडे बाेरगावकर यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. एम.जी. राठाेड, अॅड. परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले. महिला पाेलिस हवालदार एस.ए. सूर्यवंशी यांनी काेर्ट पैरवी केले.
न्यायालयात १८ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली...सरकार पक्षाच्या वतीने १८ जणांची साक्ष झाली. उपलब्ध ताेंडी पुरावा, कागदाेपत्री पुराव्याच्या आधारे लातूर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.बी. राेटे यांनी समाधान भास्कर शिंदे याला कलम ३०२ भादंविनुसार जन्मठेप, एक हाजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व वैद्यकीय पुरावा महत्वपूर्ण ठरला आहे.