आलमला (जि. लातूर) : पाणी कमी येत असल्यामुळे आडात उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील वडील, मुलगा आणि पुतण्या असून, ही घटना औसा तालुक्यातील आलमला येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली.
आलमला गावात तीव्र पाणीटंचाई असून, गावभागात खाजगी मालकीची जुनी विहीर बुजवून त्यात सिमेंट टाक्या बसवून आड तयार करण्यात आला होता. वॉर्ड क्रमांक एक मधील नागरिकांना येथून पाणी पुरवठा आहे. सदरील आडात असलेल्या मोटारीला पाणी का येत नाही म्हणून सोमवारी सकाळी काही तरुण आडात उतरले. सर्वात आधी सद्दाम फारुख मुलानी (२२) हा आडात उतरला होता. तो वर का येत नाही म्हणून त्याचे वडील फारुख खुदबुदीन मुलानी (४६) हेही आडात उतरले. तेही परत न आल्याने पुतण्या सईद दाऊद मुलानी (२६) हा आडात उतरला. आडात उतरलेल्या कोणाचाच प्रतिसाद येत नसल्याने उपस्थित नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. घटनास्थळी कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश सुरू केला. यावेळी दोन तरुणांच्या कमरेला दोरखंडाने बांधून त्यांना आडात सोडण्यात आले. मात्र त्यांनाही गुदमरल्यासारखे झाल्याने तात्काळ वर काढण्यात आले. तद्नंतर त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आडात आॅक्सिजन सोडले. परंतु, प्रतिसाद येत नसल्याने अग्निशमनचे कर्मचारी आडात उतरले. शेवटी मोठ्या कसरतीनंतर त्यांनी तिघांनाही बाहेर काढले. मात्र ते बेशुद्धावस्थेत होते. रुग्णवाहिका येण्यास विलंब लागला. तोपर्यंत फारुख खुदबुदीन मुलानी, मुलगा सद्दाम फारुख मुलानी, पुतण्या सईद दाऊद मुलानी या तिघांचाही मृत्यू झाला होता. मृतदेहांची उत्तरीय तपासणी औसा येथील रुग्णालयात झाली. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, तहसीलदार, आरोग्याधिकारी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मुलानी कुटुंबियावर शोककळा... काबाड कष्ट करून उपजीविका भागविणाऱ्या मुलानी कुटुंबियांतील तिघांचा आडात गुदमरून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. मुलानी कुटुंबियासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
१५ दिवसांपूर्वी झाला होता सद्दामचा विवाह... पाणी का येत नाही म्हणून सर्वात पहिल्यांदा आडात उतरलेल्या सद्दाम मुलानी याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. गावात प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळेला धावून जाणारा सद्दाम सोमवारीही सर्वात आधी आडात उतरला होता. सद्दाम उत्साहाने प्रत्येकाला मदत करीत असे. दरम्यान, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह सोहळ्यात आनंदात असलेल्या मुलानी कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.