किल्लारी (जि. लातूर) : येथील तेरणा नदीवरील जुन्या बंधाऱ्याजवळ मासे पकडण्यासाठी बाप- लेक गेले होते. तेव्हा अचानकपणे मुलाचा पाय घसरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी मयत मुलाचे प्रेत सापडले. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेश रमेश सूर्यवंशी (१८, रा. नदी हत्तरगा, ता. निलंगा) असे मयत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, किल्लारीनजीकच्या नदी हत्तरगा येथील रमेश भाऊराव सूर्यवंशी व त्यांचा मुलगा महेश रमेश सूर्यवंशी हे दोघे शुक्रवारी दुपारी जुन्या किल्लारी गावानजीकच्या तेरणी नदीवरील केटी बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते. दरम्यान, मासे पकडण्याच्या नादात मुलगा महेश याचा अचानकपणे पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. हे पाहून वडिलांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली.
ही माहिती गावातील पोलीस ठाण्यास मिळाल्यानंतर सपाेनि. सुनील गायकवाड, पोहेकॉ, गौतम भोळे, मंडळ अधिकारी शेख तलाठी, हालनोर, दत्ता पांचाळ यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, निलंग्यातील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यातील गंगाधर फरोडे, नागेश पुरी, अविनाश फुलारी, सोमनाथ मडोळे, दत्ता गायकवाड यांनी पाण्यात उडी घेऊन सायंकाळपर्यंत मुलाचा शोध घेतला. परंतु, सापडला नाही. शनिवारी दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी शोध घेऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोहेकॉ. गौतम भोळे करीत आहेत.