किल्लारी (जि़ लातूर) : लातुरातील भांबरी चौकातील खून प्रकरणात मुलास अटक झाल्याने नदी हत्तरगा (ता़ निलंगा) येथील माजी पंचायत समिती सदस्य सुभाष तिमन्ना शिंदे (५८) यांनी विषारी औषध प्राशन करुन उमरगा (जि़ उस्मानाबाद) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळरानावर आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली़
लातुरातील भांबरी चौकात बुधवारी कौटुंबिक वादातून तुंबळ हाणामारी होऊन अरुण भरत राठोड व आनंद दिलीप चव्हाण यांच्यावर चाकूने वार करुन खून करण्यात आल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी सागर सुभाष शिंदे याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता़ सागर शिंदे याच्यासह अन्य एकास पोलिसांनीअटक केली होती़
खून प्रकरणातील आरोपी सागर शिंदे हा निलंगा पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष तिमन्ना शिंदे (५८, रा़ नदी हत्तरगा, ता़ निलंगा) यांचा मुलगा आहे़ सुभाष शिंदे हे गावातील तंटे स्वत: पुढे होऊन सोडवित असत़ तसेच गावातील गोरगरिबांच्या अडचणीच्यावेळी धावून जात असत़ दरम्यान, आपला मुलगा खून प्रकरणात अटक केल्याचे समजात तो त्यांच्या जिव्हारी लागला़ त्यामुळे त्यांनी गुरुवारी सायंकाळी उमरगा (जि़ उस्मानाबाद) नजीकच्या आचलबेट येथील माळरानावर जाऊन मुलामुळे माझी इज्जत गेली़ त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असे गावातील मित्रांना फोन करुन सांगितले.
गावातील मित्रांनी आचलबेट माळरानावर जाऊन त्यांचा शोध घेतला़ परंतु, ते सापडले नाहीत़ दरम्यान, यासंदर्भात उमरगा पोलिसांना माहिती दिली़ पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरुन बेटजवळगा येथील माळरानावर जाऊन पाहणी केली़ तेव्हा रस्त्यानजीकच्या झुडुपाजवळील कारमध्ये सुभाष शिंदे यांचा मृतदेह आढळून आला़ त्यांचे शवविच्छेदन उमरगा येथील रुग्णालयात करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला़ त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.