लातूर : भाजप २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत आली तर गल्ली-गल्लीत गोध्रा, मणिपूर घडण्याची भीती आहे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी येथे आयोजित सभेत दिला. मुस्लिम अल्पसंख्याक जेव्हा संकटात आले, तेव्हा तेव्हा वंचित आघाडीच पुढे आली, असे ते यावेळी म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर आयोजित सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, राज्यात १६९ कुटुंबांकडे सत्ता आहे. ते हाणून पाडण्याची वेळ आली आहे. भाजप आणि काँग्रेसचे नात्या-गोत्यांचे राजकारण एकदाचे गाडून टाका, अशी टीका त्यांनी केली. तसेच काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वंचित, बहुजन, भटके व अल्पसंख्याकांना किती स्थान दिले, याचे उत्तर द्यावे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील आंदोलन करीत आहेत. काँग्रेस, भाजपने किती गरीब मराठ्यांना उमेदवारी दिली, हे आधी सांगावे.
केंद्रातील सरकार हे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स आणि तपास यंत्रणांचे आहे. लोकसभेच्या निकालानंतर अनेक काँग्रेस नेते भाजपच्या घरी दिसतील. त्यात लातूर जिल्ह्यातील लोकही दिसतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. लातूर मतदारसंघात काँग्रेसने सोयीचा उमेदवार दिला. त्यांच्या प्रमाणपत्राला न्यायालयात आव्हान दिले जात आहे, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले. लातूरचा पाणीप्रश्न कायम आहे. उजनीच्या पाण्याबद्दल इथल्या राजकारण्यांनी सतत गाजर दाखविल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.