लातूर : शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा पेटविला जातो. प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. याचा निषेध म्हणून ग्रीनला लातूर वृक्ष टीमच्या वतीने डोकं खाली पाय वर करून निषेध नोंदविण्यात आला. ज्या ठिकाणी कचरा जाळलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी डोकं खाली, पाय वर करून अनोख्या पद्धतीने शुक्रवारी निषेध आंदोलन केले.
कचरा जाळल्यामुळे हवा प्रदूषण होते. हा कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र, लोकांची नजर चुकवून अनेक ठिकाणी कचरा जाळण्याचे प्रकार घडत आहेत. या संदर्भात ग्रीन लातूर वृक्ष टीमने वारंवार जनजागृती केली, तसेच कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली, पण त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष झाले आहे. याचा निषेध म्हणून शुक्रवारी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी डोकं खाली पाय वर करून आंदोलन केले. नागरिकांनी कचरा जाळू नये, घंटागाडीकडे द्यावा. पालापाचोळाचाही कचरा असला, तरी तो जाळू नये, असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ.पवन लड्डा यांनी केले आहे.
कचरा जळणे कायद्यानुसार गुन्हा...कचरा जाळणे भारतीय दंड विधानातील कलम २७८ नुसार गुन्हा आहे. याशिवाय उपद्रव्य कृत्य म्हणून कलम २६८, पाण्याजवळ कचरा पेटविला असेल, तर कलम २७७, तसेच कलम २७९ नुसार कचरा पेटविणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार कोणताही कचरा किंबहुना पालापाचोळाही जाळण्यास बंदी घातलेली आहे. त्यामुळे कचरा जाळू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कचरा जाळल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रणकचरा जाळल्याने अनेक विषारी वायू, धूर वातावरणात पसरत असतो. यामुळे कर्करोग, यकृताचे आजार, मलाविरोध, अस्थमा, श्वसनाविरोध, मेंदू विकार होण्याची दाट शक्यता असते. फोम कप्स, अंड्याचे ट्रे जाळल्याने निघणारा स्टायरीन वायू, त्वचा आणि फुप्फुसांवर वाईट परिणाम करणारा ठरत आहे. कचरा जाळल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे संवेदनशील श्वसन यंत्रणेवर विशेषत: लहान मुलांच्या श्वसनावर विपरित परिणाम होतो. त्वचा काळवंडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे याचा त्रास होतो. डॉक्सिझनमुळे गर्भवती महिला, मुले आणि वृद्धांचे आरोग्य खालावू शकते. यामुळे कचरा जाळू नये.