औसा : औसा शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. ठराविक अंतराने चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ७ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास प्राध्यापक कॉलनीतील एका मुख्याध्यापकाचे घर फोडून जवळपास तीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.प्राध्यापक कॉलनीत राहणारे मुख्याध्यापक अनिल कल्याणराव मुळे हे औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील एका शाळेत आहेत. ७ सप्टेंबर रोजी सुटी असल्यामुळे ते दुपारपर्यंत घरीच होते. दुपारी २ वाजता अनिल मुळे हे आपल्या खाजगी कामानिमित्त लातूरला गेले होते. तर त्यांची आई व पत्नी घराला कुलूप लावून बाजारात गेल्या होत्या. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कुमारस्वामी महाविद्यालयाच्या बाजूस असलेल्या प्राध्यापक कॉलनीमधील घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरात असलेले दोन कपाट फोडून काढले. कपाटातील ८ तोळे सोन्याचे दागिने, १२ ते १५ तोळे चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ श्वानपथकाला पाचारण करून चोराचा माग शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या प्रकरणी मुख्याध्यापक अनिल मुळे यांनी औसा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)
औश्यात भरदिवसा घरफोडी
By admin | Published: September 08, 2014 12:26 AM