लातूर : गृह विभागाने राज्यातील एकूण ४४९ पाेलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यात लातूर जिल्ह्यातील १५ पाेलिस निरीक्षकांचा समावेश आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची बाभळगाव येथील पाेलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाल्याने, त्यांच्या रिक्त जागेवर आता अनेकांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा पाेलिस दलामध्ये सुरू आहे.
राज्यातील एकूण ४४९ पाेलिस निरीक्षकांपैकी ११३ जणांची मुदत पूर्ण झाली नाही. मात्र, त्यांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. तर ३३६ पाेलिस निरीक्षकांच्या मुदत पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदली आदेशामध्ये लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची बदली पाेलिस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव येथे झाली आहे. रेणापूर येथील पाेलिस ठाण्यात कार्यरत असलेले, मात्र रेणापूर येथील खून प्रकरणात नियंत्रण कक्षात आलेले डी. डी. शिंदे यांची पुणे-पिंपरी चिंचवड येथे बदली झाली आहे. साेमपान सिरसाट यांची बदली लातूर येथून नगर येथे झाली आहे. लातूरच्या जात पडताळणी समितीत असलेले पंकज सूर्यप्रकाश उदावंत यांची बदली बीडीएस छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे.
प्रशिक्षण केंद्रातील उज्ज्वला दिवाण यांची बदली जात पडताळणी समिती लातूर, रफीक रज्जाकमियाॅं सय्यद यांची बदली राज्य गुप्त वार्ता विभाग, प्रल्हाद सूर्यवंशी यांची धाराशिव, विलास खिल्लारे यांची पाेलिस प्रशिक्षण केंद्र, जालना, विनाेद पवार - धाराशिव, सुभाष उन्हाळे - नांदेड, बबिता वाकडकर - धाराशिव येथे बदली झाली आहे. वर्षा दंडिमे यांना पाेलिस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव येथे मुदतवाढ मिळाली आहे.
नागपूर, मुंबई येथून तिघांची लातुरात बदली...
नागपूर येथून दिलीप सागर नागरी हक्क सेवा विभागातून, विठ्ठल दराडे, मुंबई शहर येथून करण साेनकवडे हे लातूर जिल्ह्यात येत आहेत.