अहमदपूर शहरात विविध ३५ कार्यालये आहेत. या कार्यालयात साेमवारी अधिकारी, कर्मचारी गैरहजर असतात अशा स्वरुपाच्या तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. दरम्यान, या कार्यालयातील जवळपास ५०० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी हे जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामकाज उरकले जात आहे. काही अधिकारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कामे सांगून आठवडाभर मुख्यालयी न राहता घरातूनच कारभार करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता आमदार बाबासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्येक कार्यालयाला भेट देण्यात आली. यावेळी गैरहजर आणि कार्यालयात उशिरा दाखल हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये बहुतांश कार्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी मात्र अद्यापही गायब हाेते. याबाबत आमदार बाबासाहेब पाटील यांनी अधिक चाैकशी केली असता, उपस्थित कर्मचाऱ्यांकडे कुठलीही समाधानकारक माहिती उपलब्ध नव्हती. अहमदपूर शहरात सर्व विभागाची कार्यालये आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे उपविभाग क्रमांक - ९, लघु पाटबंधारे विभाग उपविभाग क्रमांक -१०, लघु पाटबंधारे विभाग शिरूर ताजबंद, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, लघु पाटबंधारे पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणी तपासणी प्रयोगशाळा, सामाजिक वनीकरण, वनविभाग तालुका कृषी कार्यालय, पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक - ३५, पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक - ३६, पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक - ३८, सहकारी निबंधकाचे कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग, मृदा व जलसंधारण उपविभागासह विविध विभागाच्या शासकीय कार्यालयात प्रमुख आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर काम सोपवत असल्याचे समाेर आले आहे.
यावेळी सभापती शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जि.प. सदस्य माधव जाधव, शहराध्यक्ष अझहरभाई बागवान, जिल्हा युवक कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, बाळासाहेब बेडदे, वसंत शेटकर, फेरोज शेख, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई...
गैरहजर कर्मचाऱ्यावर आता शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, संबंधितांनी या सूचनांचे पालन केले नसल्याचे दिसून येते. याबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. असे अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे म्हणाले.
जनतेची कामे वेळेवर करा...
अहमदपूर येथील बहुतांश शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्याचे आढळून आले आहे. सोमवार हा कार्यालयीन दिन असतानाही अधिकारी, कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाहीत, याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासाठी आपण प्रत्यक्ष कार्यालयांनाच भेटी देऊन पाहणी केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहून जनतेची कामे वेळेत करावी, असे आ. बाबासाहेब पाटील म्हणाले.