रेणापूर : तालुक्यातील २८ पैकी केवळ फावडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने २७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खरोळा येथे दुरंगी लढत होत असून गावावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी दिग्गज मंडळींनी प्रतिष्ठा पणाला लावून व्यूहरचना आखली आहे.
रेणापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून खरोळा गावाकडे पाहिले जाते. ही ग्रामपंचायत १५ सदस्यांची आहे. गावची लोकसंख्या जवळपास १५ हजार असून गावात ५ प्रभाग आहेत. या निवडणुकीसाठी दोन पॅनल आहेत. एका पॅनलचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा रेणा कारखान्याचे व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, पंचायत समिती माजी सभापती शिवराज सप्ताळ, खरोळा सोसायटीचे माजी चेअरमन नवनाथ भोसले, पंचायत समितीचे सदस्य कल्याण मदने, सोसायटीचे चेअरमन सुधाकर काळे, धनंजय देशमुख हे करीत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे आ. रमेश कराड यांचे समर्थक रमेश फुलारी, संगमेश्वर तत्तापूर, रमा फुलारी यांचे पॅनल आहे.
दुरंगी लढतीमुळे थेट लढत होत आहे. दरम्यान, प्रचारास कमी कालावधी असल्याने दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार करण्यात येत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीस रंग भरत असल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
प्रभाग १, ३ कडे लक्ष...
खरोळ्यातील प्रभाग १ आणि ३ मध्ये चुरशीची लढत होत आहे. वार्ड क्र. ३ मध्ये माजी सरपंच कल्पना राऊतराव यांचे पती मंचक राऊतराव, विद्यमान उपसरपंच विश्वनाथ कागले, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच प्रशांत बरबडे हे एकमेकांसमोर लढत देत आहेत. यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.