धंदे कोणाचे...
जिल्ह्यात अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांकडून केला जात आहे. मात्र, पोलीस दलाच्याच छाप्यामध्ये सापडलेले अवैध धंदे कोणाचे आहेत असा प्रश्न पडला आहे. गुटखा, मटका, सट्टा सुरूच असल्याची कुजबुज ऐकायला मिळते. विशेष म्हणजे गुटखा काही पानीटप-यांवर हमखास मिळतो. गुटखा बंद, मात्र खरेदी-विक्री सुरू हे कसे का बरे घडते. वरिष्ठांना आपल्या हद्दीत सर्वच बंद आहे, असा निरोप दिला जातो. प्रत्यक्षात तिसऱ्याच यंत्रणेने छापे टाकले की सगळे सुरू असल्याचे दिसते.
नो पार्किंग...
जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ नो पार्किंगचा मोठा फलक आहे. मात्र, त्यात दुरुस्ती करून अधिकाऱ्यांसाठी पार्किंग, इतरांसाठी नो पार्किंग करण्याची गरज आहे. कारण नो पार्किंगच्या जागेवर जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाहने बिनदिक्कतपणे थांबलेली असतात. त्यामुळे येणार-जाणाऱ्या नागरिकांना नियम फक्त फलकापुरते आहेत का असा प्रश्न पडतो. एक तर नियम सर्वांना सारखा असावा अथवा फलकात दुरुस्ती करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुभा द्यावी, अशी कुजबुज सुरू आहे.