अहमदपूर(लातूर ) : अहमदपूर नगर पालिकेतील दोन सभापती व चार सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन जिल्ह्यात खळबळ उडविली असतानाच शुक्रवारी पालिकेतील १९ नगरसेवकांनी उपनगराध्यक्षा मीनाक्षी रेड्डी यांच्यावर अकार्यक्षमतेचा आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे आज अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा अहमदपुरात राजकीय खळबळ उडाली आहे़
अहमदपूर पालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून भाजपाच्या अश्विनी कासनाळे नगराध्यक्षा तर मीनाक्षी विरेंद्र रेड्डी उपनगराध्यक्षा आहेत़ पालिकेत भाजपा- ९, राष्ट्रवादी काँग्रेस आणि साजीदभाई मित्र मंडळ- ९, शिवसेना- २, काँग्रेस- २, बहुजन विकास आघाडी- १ असे पक्षीय बलाबल आहे़शुक्रवारी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा होती़ दरम्यान, बहुतांश नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि उपनगराध्यक्षा रेड्डी यांच्याविरुध्द अविश्वास प्रस्ताव दाखल केला़ हा प्रस्ताव जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांना दिला़ या अविश्वास प्रस्तावावर सत्ताधारी पक्षासह अन्य पक्ष, आघाडी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ उपनगराध्यक्षा मीनाक्षी रेड्डी यांच्यावर अकार्यक्षमतेचा तसेच त्यांच्या मुलाचा पालिकेत हस्तक्षेप वाढला असल्याचा आरोप करण्यात आला आहे़ या प्रस्तावामुळे पुन्हा एकदा अहमदपुरात राजकीय खळबळ उडाली आहे़
आठवडाभरापूर्वी दोन सभापतींचे राजीनामेपालिकेतील बांधकाम सभापती कमलबाई आगलावे, स्वच्छता व आरोग्य सभापती रेखा माने यांच्यासह महिला व बालकल्याण उपसभापती तनुजा सूर्यवंशी, शिक्षण समितीचे सदस्य हनिफा पठाण, आरोग्य व स्वच्छता समिती सदस्य डॉ़ फुजेल जहागीरदार आणि प्रशांत कांबळे यांनी १२ जुलै रोजी आपल्या पदाचे राजीनामे मुख्याधिकाऱ्यांकडे दिले होते़ तद्नंतर मुख्याधिकाऱ्यांनी हे राजीनामे नगराध्यक्षांकडे पाठविले़ त्यावर अद्यापही निर्णय झाला नसताना शुक्रवारी उपनगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे़