चाकूर : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने राज्यातील गोरगरिबांसाठी मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली आहे. परंतु, येथील केंद्रावर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले व्यक्तीही या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी रांगेत उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. घरात दोनवेळेचे अन्न मिळत असलेलेही शिवभोजनासाठी येत असल्याने उदरनिर्वाह न होणा-या व्यक्तींपुढे नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोरगरिबांना अत्यल्प दरात भोजन मिळावे म्हणून १० रुपयांत शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात केली. चाकुरातील बसस्थानकात ही थाळी एप्रिल २०२० पासून सुरु झाली. चालक गणेश नरवटे यांना दररोज शंभर ताटाप्रमाणे थाळी देण्याची सरकारी मान्यता मिळाली. त्यामुळे शहरासह तालुक्यात मोलमजुरी करणारे तसेच ज्यांना कुठलेही काम होत नाही, अशा व्यक्तींना आधार मिळाला. १० रुपयांप्रमाणे दररोज ५० ते ७० जण या थाळीचा आस्वाद घेत असत.
गत जुलैपासून शिवभोजन थाळी ५ रुपयांत देण्यास सुरुवात झाली. तेव्हा दररोज ५० ते ८० जण त्याचा लाभ घेत असत. दरम्यान, कोरोनाचे संकट निर्माण झाल्यामुळे राज्य शासनाने शिवभोजन थाळी १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत मोफत देण्याचे जाहीर केले. त्यानुसार या केंद्रातून मोफत शिवभोजन थाळी देण्यास सुरुवात झाली. शिवभोजन थाळी ऑनलाईन ही सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मिळते. आता या थाळीचा आस्वाद घेण्याच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेलेही व्यक्ती येत आहेत. त्यामुळे थाळींना मागणी वाढली असून दररोज ९० ते १०० जवळपास दिली जात आहे. ज्यांना घरी आनंदाने भोजन मिळते, अशीही मंडळी मोफतच्या शिवभोजन थाळीचा स्वाद चाखत आहेत. त्यामुळे गरिबांना हक्काची थाळी मिळणे कठीण झाले आहे.
थाळीसाठी मागणी वाढली...
येथील शिवभोजन थाळी केंद्रात सीसीटीव्ही आहे. त्यात प्रत्येकाचा चेहरा कैद होतो. त्याची अनेकांना माहिती नाही. येथील स्थिती ऑनलाईनच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयात पहावयास मिळते. पूर्वी शिवभोजन थाळीला मागणी कमी होती. परंतु, आता चांगले व्यक्तीही येथे येत आहेत. थाळीची दररोजची क्षमता शंभरची आहे. थाळी घेण्यासाठी कोण गरीब, कोण श्रीमंत हे आम्ही पाहत नाही. शंभर थाळी संपल्या की केंद्र बंद करतो.
- गणेश नरवटे, शिवभोजन थाळी केंद्रचालक
गरजूंसाठी शिवभोजन थाळी...
शिवभोजन थाळी ही समाजातील अत्यंत गरजूंसाठी आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात ज्यांना पाच रुपये देणे शक्य नाही, अशांसाठी शासनाने ही थाळी मोफत केली आहे. परंतु ज्यांना पोटभर जेवण मिळते, असे व्यक्ती रांगेत थांबत असतील तर दुसरे दुदैव नाही. ज्यांचे पोट हातावर आहे, अशा व्यक्तींनी शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.