लातूर - ठेवीदारांना त्यांच्या ठेवीवर १८ टक्के परतावा देतो म्हणून लाखो रुपये भरुन घेत शुभमंगल मल्टीस्टेटच्या औसा शाखेने तालुक्यातील ठेवीदारांना लाखो रुपयांना गंडविले. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात मल्टीस्टेटच्या संस्थापक अध्यक्षासह संचालक मंडळातील ११ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.औसा शहरात शुभमंगल मल्टीस्टेटची एक शाखा सुरू करण्यात आली होती. या शाखेच्या संचालक मंडळाने ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून शहरासह तालुक्यातील ठेवीदारांच्या २४ लाख ५२ हजार ७८ रुपयाच्या ठेवी गोळा केल्या. काही महिने ठेवीदारांना नियमीतपणे परतावा देण्यात आला. पण २०१४ ते १७ या तीन वर्षाच्या काळात परतावा दिला नाही. याबाबत सबंधितांना विचारले असता ठेवीदारांना असमाधानकारक उत्तर देत ही शाखा बंद करून पसार झाले. याबाबत ठेवीदारांनी सतत पाठपुरावा केला. पण काही उपयोग झाला नाही़ याबाबत औशातील ठेवीदार माणीक रंगराव फुटाणे (वय ७५, सेवानिवृत्त माजी सैनिक) यांनी औसा पोलिसांत मार्चमध्ये फसवणुकीची फिर्याद दिली. पोलिसांनी पाच महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे़यांच्यावर झाला गुन्हा दाखलशुभमंगल मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट, भास्कर बजरंग शिंदे, विजय दिलीप आपेट, शालिनी दिलीप आपेट, अभिजित दिलीप आपेट, नागीणबाई बजरंग शिंदे, कमलाबाई बाबासाहेब नकाते, प्रतिक्षा अंधाळे, उषा बिराजदार, बाबुराव सोनकांबळे, अजय दिलीप आपेट (सर्व रा. हावरगा ता.कळंब,जि.उस्मानाबाद) यांच्यावर कलम ४०६, ४२०, ३४ भादंवि. तसेच महाराष्ट्र ठेवीदार वित्तीय संस्था हितसबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राहकांची फसवणूक : शुभमंगल मल्टीस्टेटच्या संस्थापकासह संचालक मंडळावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 6:47 PM