लातूर शहर व जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. या चोरीच्या घटना उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकाला मोटारसायकल चोरीतील एक संशयित आरोपी रेणापूर नाका परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने रेणापूर नाका परिसरात सापळा लावला असता महादेव नवनाथ खाडप (रा. सरस्वती नगर रोड, लातूर) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता,त्याने त्याचा साथीदार प्रफुल श्रीमंत गायकवाड (रा. सिद्धार्थ सोसायटी, लातूर) याच्या मदतीने दोन मोटारसायकल तसेच लातूर बसस्थानक येथून पाच मोबाइल चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याजवळील दोन मोटरसायकल व पाच विविध कंपन्यांचे मोबाइल जप्त केले आहेत. कारवाईत पथकाने एकूण १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला असून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महादेव नवनाथ खडप यास पुढील कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव,पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार राम गवारे, योगेश गायकवाड, हरून लोहार, प्रमोद तरडे, भिष्मानंद साखरे, चालक अमलदार लांडगे यांचा समावेश होता.