लातूर : बार्शी-मुरुड राज्य मार्गावरील मुरुड-अकोला नजिक पुलावरून भरधाव वेगातील कार सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोसळली. या भीषण अपघातात कारमधील ५ जण जागीच ठार झाले असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत व जखमी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. जखमींना सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.कळंब तालुक्यातील डिकसळ येथून ७ जण ढोकी-मुरुड मार्गे लातूरला कारने लग्नाला येत होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार मुरुड-अकोला नजिक असलेल्या पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कार १५ फूट खोल खड्ड्यात पडल्याने चेंदामेंदा झाली. त्यात ज्ञानेश्वर बब्रुवान खंदारे (२५), परमेश्वर ज्योतिबा अंबिरकर (३२, चालक), जगन्नाथ चंद्रकांत पवार (३२, तिघेही रा. डिकसळ, ता. कळंब), गणेश मनोहर सोमासे (३१, रा. खडकी, ता. कळंब), जरचंद हरिभाऊ शिंदे (३५, रा. युसुफ वडगाव, ता. केज) हे पाच जण जागीच ठार झाले. तर श्रीकांत अंबिरकर, दत्तात्रय जाधव हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मयतांचे शवविच्छेदन शासकीय सर्वोपचार रुग्णालयात सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बार्शी-मुरुड राज्य मार्गावरील पुलावरून कार कोसळून ५ ठार, २ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 6:54 PM