राजकुमार जाेंधळे
लातूर : विविध ठाण्यांच्या हद्दीत आम्ही पोलिस आहोत, पुढे दंगल सुरू आहे. तुमच्याकडे असलेले मौल्यवान दागिने काढून ठेवा, अशी थाप मारून दिशाभूल करून दागिने काढून घेणाऱ्या, रस्त्यात नागरिकांना लुटणाऱ्या पाच तोतया पोलिसांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांना एक-दोघांनी रस्त्यातच गाठून आम्ही पोलिस आहोत. पुढे काही तरी गडबड सुरू आहे. दंगल सुरू असून, अंगावरील दागिने, मौल्यावान वस्तू एखाद्या हातरुमालामध्ये गुंडाळून ठेवा, असे म्हणून त्यांचे ते दागिने सुरक्षित ठेवल्याचा बहाणा करून असे तोतये दिशाभूल करून ते दागिने काढू घेत आणि एखाद्या हातरुमालामध्ये, कागदामध्ये खडे ठेवून ते दागिने म्हणून भेंडोळे त्यांच्या हाती ठेवत. यातून गत काही दिवसांमध्ये लातूर शहर आणि जिल्ह्यात अशा तोतयांकडून अनेकांची फसवणूक झाली.
या गुन्ह्यातील आराेपींच्या अटकेचे आदेश पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार स्थागुशाने त्यांचा शोध सुरू केला. कसून चौकशी केला असता, त्यांचे बिदर शहरात वास्तव्य असून, ते लातूर जिल्ह्यात वावरत आहेत, अशी माहिती खबऱ्याने दिली. या माहितीची पडताळणी करून स्थागुशाच्या पथकाने सापळा लावला. या सापळ्यात जावेद बाली जाफरी (वय ४१), नजीर हुसेन अजीज अली (वय ५२, रा. चिदरी राेड, बिदर), नसीर अली (वय ४८, रा. हुसेनी काॅलनी, बिदर), तक्की युसूफ अली (वय ४०) आणि हसनी नासीर हुसेन (वय ४४, रा. हराणी गल्ली, बिदर) हे पाच तोतये अलगदपणे अडकले असून, त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांना उदगीर ग्रामीण, अहमदपूर ठाण्याच्या ताब्यात दिले आहे, असे स्थागुशाचे पाेनि संजीवन मिरकले म्हणाले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात वावर...
बिदरमध्ये राहणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात वावर आहे. गुन्हा केल्यानंतर ते तातडीने बिदर शहराकडे निघून जात, अशी माहिती समाेर आली. त्यांनी अनेकांना बतावणी करून लुटल्याचे पोलिसांनी सांगितले.