प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे.शहरी व ग्रामीण भागामध्ये ही योजना राबविण्यात येत असून १ जानेवारी २०१७ अथवा तदनंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे. किंवा पहिल्यांदा गर्भधारणा झाली आहे. त्यांना शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जातो. पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्याची ही योजना आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार, दुसऱ्या दोन हजार आणि तिसऱ्या टप्प्यात तीन हजार असे एकूण पाच हजार रुपये संबंधित मातांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहे. लातूर जिल्ह्यात २०१७ पासून ५१ हजार १३५ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून २०.२४ कोटी संबंधित मातांच्या खात्यावर आरोग्य विभागाच्या वतीने वर्ग करण्यात आले आहेत.
तीन टप्प्यात मिळतात पैसे.....
गरोदरपणाच्या एकशे पन्नास दिवसांमध्ये एक हजार रुपयाचा पहिला टप्पा असून प्रसवपूर्व तपासणी झाल्यानंतर सहा महिन्या नंतर दोन हजार रुपयांचा दुसरा टप्पा आहे. प्रसूतीनंतर १४ आठवड्यापर्यंत तीन हजार रुपयाचा तिसरा टप्पा मातांच्या खात्यावर जमा केला जातो.
पात्रतेचे हे आहेत निकष.....
लाभार्थी व त्यांच्या पतीचे आधार कार्ड,लाभार्थ्यांचे आधार कार्ड संलग्न बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १५० दिवसाच्या आत केलेली नोंद, शासकीय संस्थेत गरोदरपणा दरम्यान तपासणी,बाळाची जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण या निकषांची पूर्तता केलेल्या मातांना योजनेचा लाभ दिला जातो.
आरोग्य विभागाशी करा संपर्क
प्रारंभी ही योजना महिला व बाल कल्याण विभागाच्या मार्फत राबविली जात होती. मात्र आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेच्या लाभासाठी आरोग्य विभागाची संपर्क साधता येईल.
कोट....
लातूर जिल्ह्यात १ जानेवारी २०१७ पासून योजना राबविली जात आहे. पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यांमध्ये ५००० रुपये या योजनेत दिले जातात. जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार १३५ मातांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. डॉ.गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी