लातूर : सर्वसामान्यांना हवाई सफरीचा लाभ मिळावा, विमानतळांचा विस्तार व्हावा, हवाई कनेक्टिव्हिटी वाढावी, यासाठी केंद्र शासनाने ‘उडान’ योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक विमानतळांना नवसंजीवनी मिळाली असून, या ठिकाणाहून विमानसेवा सुरू झाली आहे. मात्र, या योजनेत अद्यापपर्यंत लातूरच्या विमानतळाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आगामी काळात ‘उडान’मधून तरी लातूर विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार का? असा प्रश्न लातूरकरांमधून विचारला जात आहे.
लातूर-बार्शी मार्गावरील बारा नंबर पाटीनजीक ३०० एकर क्षेत्रावर लातूर विमानतळ आहे. १९९८ मध्ये या विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. हे काम २००७ मध्ये पूर्ण झाले. तर १० ऑक्टोबर २००८ रोजी पहिले विमान लँडिंग झाले होते. दरम्यान, पुढील वर्षभर लातूर ते मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू होती. तर २५ ऑगस्ट २००९ मध्ये या विमानतळावरून शेवटच्या प्रवासी विमानाचे उड्डाण झाले. तेव्हापासून आतापर्यंत या विमानतळावरून प्रवासी विमानांची वाहतूक झालेली नाही. सध्या दररोज ३ ते ४ प्रशिक्षणार्थींची विमाने या ठिकाणी येत असून, महिन्यात तीन ते चार चार्टर विमानांचे लँडिंग होते.केंद्र शासनाने विमानतळांच्या विकासासाठी तसेच प्रवाशांना परवडेल यासाठी उडान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत अनेक विमानतळांना इतर शहरांशी जोडण्यात आले. मात्र, लातूरच्या विमानतळाला या योजनेंतर्गत अद्यापही उभारी मिळालेली नाही. आगामी काळात तरी या योजनेंतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा लातूरकरांना आहे.
मुंबई, तिरुपतीसाठी प्रवाशांची मागणी...लातूर व परिसरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच तिरुपती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जातात. त्यामुळे उडान योजनेंतर्गत या विमानतळावरून लातूर-मुंबई व लातूर-तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
विमानतळावर सर्व सुविधा उपलब्ध...लातूर विमानतळावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी १७०० मीटर अंतराची धावपट्टी आहे. ३०० मीटरचा सुरक्षित परिसरही आहे. याच परिसरात मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच व्यावसायिक पायलट ट्रेनिंग सेंटरही विमानतळ परिसरात सुरू होणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्याने विमान वाहतूक सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण नाही.
७२ प्रवाशांचे विमान उतरू शकते...लातूर विमानतळाच्या धावपट्टीवर ७२ प्रवासी क्षमता असलेले विमान लँडिंग किंवा उड्डाण करू शकते. उडान योजनेंतर्गत प्रवाशांना तिकीट परवडणारे आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळणार आहे. आता केवळ उडान योजनेसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून लातूर विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी सुरू करावे, अशी मागणीही होत आहे.