लातूर : गुणवत्तापूर्ण सेवा- सुविधा देत राज्याबरोबर देशात आपला लौकिक केलेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत उतरली आहेत. विशेषत: राज्यात पहिल्यांदाच लातुरातील हे उपकेंद्र काठीण्यपूर्ण परीक्षा देत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सेवेचे कौशल्य पणाला लागली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने एनक्यूएएस कार्यक्रम राबविण्यात येतो. त्यात दाखल आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे केंद्रस्तरावरुन राष्ट्रीय मूल्यांकन करण्यात येते. जिल्ह्यात एकूण ५० प्राथमिक आरोग्य केंद्र व २५२ उपकेंद्र आहेत. त्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांनी एनकॉसच्या मानांकनावर मोहोर उमटविली आहे. तत्पूर्वी प्रधानमंत्री उत्कृष्ट सेवा, कायाकल्प पुरस्कार मिळविले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए.सी. पंडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. कापसे, डॉ. एस. सुळे, डॉ. पी.ए. रेड्डी, डॉ. गुणाले यांनी एनक्यूएएस मुल्यांकनासाठी तयारी सुरु केली.
उदगीर तालुक्यातील सर्वाधिक उपकेंद्र...एनक्यूएएस मुल्यांकनासाठी उदगीर तालुक्यातील किणी यल्लादेवी, तोंडचीर, तोंडार, अवलकोंडा या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. त्याचबरोबर घोणसी (ता. जळकोट), सारोळा (ता. औसा), काजळहिप्परगा (ता. अहमदपूर) आणि पाखरसांगवी (ता. लातूर) येथील उपकेंद्र आहेत.
१२ सेवांचा मूल्यमापन...एनक्यूएएसअंतर्गत गर्भधारणा व बाळांतपणात घ्यावयाची काळजी, नवजात आणि अर्भक आरोग्य सेवा, बालपण व किशोरवयीन आरोग्य सेवा, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य रोग व्यवस्थापन, किरकोळ घटकांसह साध्या आजाराचे व्यवस्थापन, असंसर्गजन्य रोग व्यवस्थापन, सामान्य नेत्ररोग आणि कान-नाक-घश्याची काळजी, मुख्य आरोग्य, वृध्द, आपत्कालिन वैद्यकीय सेवा, मानसिक आरोग्याच्या आजारांचे व्यवस्थापन अशा १२ सेवांचे मूल्यमापन केले जाते.
केंद्राचे द्विसदस्यीय पथक दाखल...जिल्ह्यातील आठ आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांच्या मूल्यमापनासाठी केंद्रस्तरीय डॉ. संतोष कंचयानी (कर्नाटक) व डॉ. के. मरियम्मा (तेलंगणा) यांचे द्विसदस्यीय पथक दाखल झाले आहे. २९ जूनपर्यंत उपकेंद्रांची तपासणी करुन मूल्यमापन करणार आहे.
साडेसहा लाखांचा तीन वर्षांत निधी...केंद्रीय स्तरावरील या स्पर्धेत मानांकन मिळाल्यास सेवेचा आणखीन दर्जा वाढणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक उपकेंद्रास दरवर्षी २ लाख १६ हजार याप्रमाणे तीन वर्षे निधी मिळणार आहे. एका उपकेंद्रास तीन वर्षांत ६ लाख ४८ हजारांचे अनुदान मिळणार आहे.
मानांकनासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न...राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत राज्यात पहिल्यांदाच लातुरातील आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र उतरले आहेत. गुणवत्तापूर्ण सेवेच्या माध्यमातून मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. मानांकनामुळे आणखीन गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.- डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.