चाकूर (जि. लातूर) : तालुक्यातील हणमंत जवळगा येथे पाण्याची समस्या गंभीर बनली असून, हिंपळनेर येथील काही लोकांनी पाणीपुरवठा योजनेवरील पाइपलाइन, पॅनल बोर्डची तोडफोड केली, त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून प्रशासनाकडे ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. मात्र, दखल न घेतल्याने शुक्रवारी हणमंत जवळगा येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडला. चौघांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तातडीने रोखल्याने अनर्थ टळला.
हिंपळनेर येथील साठवण तलावातून हणमंत जवळगा गावाला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. हिंपळनेर गावातील काही नागरिकांनी या योजनेवरील पाइपलाइन, मोटार, पॅनल बोर्ड, आदींचे नुकसान केले आहे. त्यामुळे हणमंत जवळगा गावची पाणीपुरवठा योजना बंद पडली असून, आता गावातील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पुरवठा पूर्ववत करणार हणमंत जवळगा येथील पाणीपुरवठा योजनेची नासधूस केली असून, त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गावचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांनी सांगितले.