चाकूर (लातूर ) : तालुक्यातील भाटसांगवी येथील अंगणवाडीच्या छताचा गिलावा पडल्याने चार बालके जखमी झाल्याची घटना आज सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास घडली़ यातील एक बालक गंभीर आहे़ या सर्वांना उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे़
भाटसांगवी (ता़ चाकूर) येथे दोन अंगणवाड्या आहेत. एक १९९२ मध्ये तर दुसरी २००८ मध्ये बांधण्यात आली आहे़ २००८ मध्ये बांधण्यात आलेल्या अंगणवाडीत २४ बालके आहेत़ नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी अंगणवाडी भरली़ तेव्हा १७ बालके उपस्थित होती़ सकाळी ११़४५ वा़ च्या सुमारास अंगणवाडीच्या छताचा गिलावा पडला़ त्यात अस्था ज्ञानेश्वर जाधव (५), मानवी यादव कांबळे (५), अनुजा विनोद कवठे (४), पंकजा निळकंठ पाटील (४) ही चार बालके जखमी झाली़ त्यातील मानवी कांबळे हिस जास्त मार लागला आहे. या सर्वांवर चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. पुरुषोत्तम कोडगिरे यांनी उपचार केले. चौघांनाही पुढील उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले़
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, गटविकास अधिकारी शाम गोडभरले, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील, पंचायत समिती सदस्य महेश व्हत्ते, मनसेचे अजित घंटेवाड आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. इमारतीची तपासणी करुनच यापुढे येथे अंगणवाडी भरविण्यात यावी, अशा सूचना सभापती देशमुख यांनी केल्या़ यासंदर्भात चौकशी करुन कार्यवाही केली जाईल, असे गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी सांगितले.