राजकुमार जाेंधळे / लातूर : खिशातील ११०० रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या एका बेघर तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना साेमवारी पहाटे घडली हाेती. दरम्यान, यातील आराेपीला शिवाजीनगर पाेलिसांनी काही तासांत बेड्या ठाेकल्या असून, त्याला लातूर न्यायालयात मंगळवारी दुपारी हजर केले असता, न्यायालयाने २८ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या संकुल परिसरात बेघर असलेला तरुण अक्षय ऊर्फ आकाश राम तेलंगे (२४, रा. गाेपाळनगर, लातूर) हा नेहमीप्रमाणे रविवारी रात्री झाेपला हाेता. ताे दिवसभर शहरात भटकंती करत हाेता अन् रात्रीच्या वेळी संकुलाच्या गॅलरीमध्ये मुक्काम करत हाेता. दरम्यान, क्वाईलनगर भागातील अक्षय ऊर्फ भुऱ्या गणपती अंकुशे (वय २७) याने साेमवारी पहाटे त्याचा केवळ ११०० रुपयांसाठी डाेक्यात दगड घालून खून केला. त्याची ओळख पटू नये यासाठी त्याने चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केला. ही घटना साेमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. यातील आराेपीचा शाेध घेत शिवाजीनगर पाेलिसांनी अक्षय ऊर्फ भुऱ्या गणपती अंकुशे याला काही तासांतच अटक केली. आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
शिवाजीनगर पाेलिस ठाण्याच्या पथकाने आराेपी भुऱ्याला मंगळवारी लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली, अशी माहिती पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली. अधिक तपास पाेलिस उपनिरीक्षक एस.के. पाेगुलवार हे करीत आहेत.