लातूर : मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आणि जबरी लुटालूट, चोरी करणाऱ्या टोळीतील चार जणांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून दुचाकी आणि ३२ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी सांगितले, काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मोटारसायकल चालकाला अडवून लुटले होते. त्याच्याकडील मोबाईल हिसकावत पळ काढला होता. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी गुन्ह्यातील आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिर्यादीकडे सखोल विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असलेल्या लातूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी पोलिस पथकाला खबऱ्याने माहिती दिली.
या माहितीच्या आधारे प्रफुल प्रकाश पवार, (वय २३, रा. गिरवलकर नगर, लातूर), आकाश भरत बिराजदार (वय २४, रा. न्यू भाग्यनगर, लातूर), प्रद्युम्न उर्फ सोन्या सतीश माळी( वय २५, रा. गातेगाव) आणि शोएब महबूब पाशा शेख ( वय २३, रा. वाल्मिकी नगर ,लातूर) यांना लातूर शहरातील बार्शी रोडवरील पाण्याची टाकी येथे चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेले एकूण ३२ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 3 लाख ७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, अंमलदार माधव बिलापट्टे, राजेश कंचे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे,जमीर शेख, तुराब पठाण, नितीन कठारे ,नकुल पाटील यांच्या पथकाने केली.