उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, २३ जुलै, २०२० रोजी शहर पोलीस ठाण्याचे अहमद पठाण व महेश मुसळे यांचे गस्त पथक नाईक चौकातून जात होते. तेव्हा तेथील स्टेट बँकेचे एटीएमची मशीन फोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरोपीस रंगेहात पकडले, तेव्हा त्याचे तीन साथीदार पसार झाले. हा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे त्याची ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर, ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्थागुशाचे नामदेव सारूळे, चंद्रकांत कलमे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, दयाराम सूर्यवंशी यांनी तीन तासांत पळून गेलेल्या इतर तिघा आरोपींना बिदर रोडसमोरील पंपासमोरून ताब्यात घेतले होते.
या प्रकरणी गुरुबस खंकरे यांच्या फिर्यादीवरून मंगेश जाधव (रा.पाटोदा, ता.जळकोट), सिद्धार्थ ताटवाडे (रा.रेड्डी कॉलनी, उदगीर), दिगंबर डोंगरे (रा.समतानगर, उदगीर), सिकंदर शेख (रा.विकासनगर, उदगीर) यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात २३ जुलै, २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ग्रामीण ठाण्याचे सपोनि.अशोक घारगे यांनी वरील सर्व आरोपींविरुद्ध पुरावे जमा करून, उदगीरच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. न्यायालयाने चारही आरोपींना २ वर्षे ३ महिने कारावास व प्रत्येकी १२ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.