लातूर : येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील ३ काेटी ६८ लाखांच्या घाेटाळ्याप्रकरणी लातूर येथील न्यायालाने चाैघा आराेपींना दाेषी ठरवत चार वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी २५ हजारांचा दंड अशी शिक्षा लातूर येथील न्यायालयाचे मुख्य न्याय दंडाधिकारी गु. र. ढेपे यांनी सुनावली आहे.
लातुरातील वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात २०१५ ते २०१७ या कालावधीत आरोपी गुलाबसिंग आनंदराव घोती आणि रमेश देवराव ढाले हे जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्याचबराेबर आरोपी बालाजी गणपती पवार, महादेव विलास जाधव हे मानधनावर लिपिक म्हणून नेमणुकीला होते. या कालावधीत लातूर जिल्हा कार्यालयाला मुंबई मुख्यालयाकडून आलेल्या निधीचा आरोपींनी संगनमत करून ३ कोटी ६८ लाखांचा अपहार केला. शिवाय, याबाबतचे सर्व रेकॉर्ड नष्ट करून पुरावा नष्ट केला. याबाबत गांधी चाैक ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आरोपींनी संगनमत करून पदाचा गैरवापर केला. स्वतःच्या फायद्यासाठी वसंतराव नाईक विकास महामंडळाचे नियम व अटींचे उल्लंघन करत लाभार्थ्यांचा विश्वासघात केला. लातूरच्या कार्यालयाला प्राप्त ३ काेटी ६८ लाखांच्या निधीचा अपहार केला. लाभार्थ्यांना कर्जापासून वंचित ठेवले. यासंबंधीचे सर्व रेकॉर्ड जाणीवपूर्वक नष्ट केले.
गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी केला. सरकार पक्षाच्या वतीने सुवर्णा चव्हाण यांनी न्यायालयात बाजू मांडली. सरकारपक्षाचा पुरावा ग्राह्य धरत चार आरोपींना कलम ४०९ नुसार चार वर्षांची, तर कलम २०१ नुसार तीन वर्षांची शिक्षा, प्रत्येकी २५ हजारांच्या दंडाची शिक्षा लातूर येथील न्यायालयाचे मुख्य न्याय दंडाधिकारी गु. र. ढेपे यांनी सुनावली. शिक्षेच्या मुद्द्यावर विशेष सरकारी वकील शिवकुमार जाधव यांनी युक्तिवाद केला. या खटल्यात ॲड. सुवर्णा चव्हाण यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयश्री पवार यांचे मार्गदर्शन लाभले.