लातूर : शासकीय कार्यालयाशी संबंधित दाेन बॅंक खात्यातील २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समाेर आला. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात चार जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. यातील दाेघांना पाेलिसांनी अटक केली असून, त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, तहसीलदार महेश मुकुंद परांडेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, महसूल विभागातील तत्कालीन लिपीक मनाेज नागनाथ फुलेबाेयणे याच्याकडे बॅंक खात्यांचा कारभार हाेता. दरम्यान, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निधी वितरणाचा आदेश देण्यात आला हाेता. जलसंधारण अधिकाऱ्यांना दाेन धनादेश देण्यात आले हाेते. ज्यामध्ये १२,२७,२९७ आणि ४१,०६,६१० रुपये आरटीजीएसद्वारे वितरित करण्यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शाखेत आरटीजीएस फाॅर्म जमा करण्यात आले हाेेते. मात्र, खात्यात केवळ ९६ हजार ५५९ रुपये शिल्लक असल्याचे आढळून आले. यामुळे या अपहार प्रकरणाचा धक्कादायक प्रकार समाेर आला. लेखापरीक्षणानंतर या अपहार प्रकरणाची व्याप्ती समाेर आली. तब्बल २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचे समाेर आले.
याप्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मनाेज नागनाथ फुलेबाेयणे, अरुण नागनाथ फुलेबाेयणे (रा. बाेरी, ता. लातूर), सुधीर रामराव देवकत्ते आणि चंद्रकांत नारायण गाेगडे यांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मनाेज फुलेबाेयणे आणि चंद्रकांत गाेगडे यांना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांना लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आठ दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.