लातूर : एका फायनान्स कंपनीचा एजंट असल्याची बतावणी करून, ८ लाख ३० हजार रुपये घेऊन, त्यातील तीन लाखांची कार दिली. मात्र, त्या कारची कागदपत्रे दिली नाहीत. शिवाय, दुसऱ्या कारसाठी घेतलेले ५ लाख ३५ हजार रुपये न देता गंडा घातल्याची घटना लातुरात घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात पुण्यातील तिघांविराेधात साेमवारी पहाटेच्या सुमारास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी गणेश भीमाशंकर माने (वय ५२ रा. संत ज्ञानेश्वरनगर, लातूर) यांना पुणे येथील प्रफुल्ल अबाळे याच्यासह अन्य दाेघांनी संगनमत करून, मी फायनान्स कंपनीचा एजंट आहे, असे सांगून फायनान्समधून कमी किमतीत दुचाकी, कार देताे असे म्हणून आरटीजीएस, फाेन-पेद्वारे ८ लाख ३५ हजार रुपये घेतले. त्यापैकी ३ लाखांची कार दिली.
मात्र, त्या कारच्या मालकीची कागदपत्रे दिली नाहीत. तसेच दुसऱ्या कारसाठी घेतलेले ५ लाख ३५ हजार रुपये फिर्यादीकडून विश्वासाने घेतले व ती कार व पैसे मागण्यासाठी फिर्यादी हा पुणे येथे गेला असता, त्यांना तेथे आराेपींनी शिवीगाळ करून खाेटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात पुणे येथील प्रफुल्ल अबाळे याच्यासह अन्य दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास लातूर पाेलिस करत आहेत.