किनगाव : लातूर जिल्ह्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ अहमदपूर तालुक्यातील उजना येथील सिध्दी शुगर साखर कारखान्याची २ कोटी ७२ लाख ४३ हजार १५० रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी किनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कारखाना आमदार बाबासाहेब पाटील यांचा आहे.
पोलिसांनी सांगितले, प्रदीपराज चंद्रबाबू, प्रदीप कालादास गायत्री (तामिळनाडू) व अभिजीत व्ही. देशमुख (रा. शिर्डी, जि. अहमदनगर) यांनी संगनमत केले. उजना येथील सिध्दी शुगर साखर कारखान्याची केंद्र शासनाच्या अनुदान योजनेंतर्गतच्या करारानुसार २ हजार ६०७ मेट्रिक टन साखर १२ नोव्हेंबर २०१९ ते १२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत खरेदी केली. करारानुसार साखर निर्यात करुन त्याचे कागदपत्र केंद्र सरकारकडे जमा करणे व त्याअधारे कारखान्याला अनुदान मिळणे गरजेचे असताना आरोपींनी खरेदी केलेल्या साखरेची निर्यात केली नाही. करारानुसार कागदपत्र केंद्र शासनाकडे जमा न झाल्यामुळे कारखान्याने कर्मचाऱ्यांमार्फत वारंवार मागणी केली. परंतु, ते देण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र शासनाकडून कारखान्याला मिळणाऱ्या २ कोटी ७२ लाख ४३ हजार १५० रुपयांच्या अनुदानाचे नुकसान झाले. याप्रकरणी कारखान्याचे कर्मचारी लक्ष्मण पाटील यांच्या फिर्यादीवरुन किनगाव पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव हे करत आहेत.