- हणमंत गायकवाडलातूर : महानगरपालिकेने महिलांसाठी मोफत शहर बससेवा सुरु करुन साडेपाच महिने उलटले असून, या कालावधीत शहरातील १२ लाख ४० हजार महिलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. ८१ लाख ६४ हजार रुपयांच्या किंमतीची मोफत सेवा महानगरपालिकेने पुरविली आहे. एका फेरीला ३५ महिलांना मोफत बससेवा देण्याचा प्रयत्न मनपाच्या परिवहन विभागाचा आहे.महिलांसाठी १८ मार्चपासून मोफत शहर बससेवा सुरु करण्यात आली असून, एकूण १८ बसेस मार्फत ही सेवा सुरु आहे. एका फेरीत किमान ३५ महिलांना बससेवेचा लाभ दिला जातो. गेल्या साडेपाच महिन्यांमध्ये १२ लाख ४० हजार महिलांनी मोफत बससेवेचा लाभ घेतलेला आहे. या सेवेसाठी कंत्राटदार संस्थेने ८१ लाख ६४ हजार रुपयांची डिमांड केली होती. त्यापैकी ५४ लाख रुपये मनपाच्या परिवहन विभागाने खाजगी संस्थेला दिले आहेत.
लातूर महानगरपालिका महिलांना मोफत बससेवा देणारी पहिली महापालिका आहे. या मोफत सेवेचा लाभ गृहिणींसह विद्यार्थीनी घेत असल्याचे मनपातील परिवहन विभागाचे अधिकारी बालाजी रुपनर यांनी सांगितले.
मनपाच्या तीन बसेसची सेवा बंद...महानगरपालिकेच्या मालकीच्या तीन बसेस आहेत. त्या तीनही बसेस नादुरुस्त झाल्याने जागेवरच आहेत. बंद पडलेल्या या बससेचे स्पेअर्स पार्ट मिळत नाहीत. त्यामुळे खाजगी कंत्राटदाराकडून या बसेस बंद ठेवलेल्या आहेत. मनपाच्या परिवहन विभागाने संबधित कंत्राटदाराकडे बस सुरु करण्यासंदर्भात वारंवार सुचना केल्या. परंतू, दुरुस्तीसाठी स्पेअर पार्ट मिळत नसल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात येते, असेही परिवहन विभागातून सांगण्यात आले.
दररोज ५०० रुपयांचा दंड...मनपाच्या मालकीच्या तीन बसेस बंद का ठेवल्या या कारणास्तव कंत्राटदाराला दररोज ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. यातील दंडाची काही रक्कम वसूलही करण्यात आली आहे. तरीही स्पेअर पार्ट मिळत नसल्याचे कारण सांगून तीनही बस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तिकिटाचा दर दहा रुपये...दहा रुपये तिकिट दर याप्रमाणे १२ लाख ४० हजार महिलांनी शहर बसमधून प्रवास केला आहे. दहा रुपये तिकिट आकारणी ग्राह्य धरली तर ८१ लाख ६४ हजार रुपये होतात. एवढ्या तिकिटाचा मोफत प्रवास महिलांना मिळाला आहे. मोफत प्रवासाची सेवा सुरुच असून, ती अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न परिवहन विभाग करीत असल्याचे विभागप्रमुख बालाजी रुपनर यांनी सांगितले.