लातूर : गत आठ महिन्यांपासून पाेलिसांना चकवा देत फरार असलेल्या दराेड्यातील आराेपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. पाेलिसांनी सांगितले, १२ ऑक्टाेबर २०२२ रोजी मध्यरात्री कातपूर शिवारातील एका व्यावसायिकाच्या घरात दराेडेखाेरांनी प्रवेश करत रिव्हाल्व्हर, चाकूचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्क्म असा २ कोटी ९८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला हाेता.
दरम्यान, यातील दराेडेखाेरांच्या मुसक्या लातूर, पुणे आणि जालना जिल्ह्यात आवळल्या. त्यांच्याकडून दराेड्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार, दरोड्याचा कट रचणारा विजय गायकवाड हा गुन्ह्यापासून फरार होता. तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता, त्याचा पाेलिस शोध घेत होते. मात्र, वास्तव्याचे ठिकाण सतत बदलत असल्याने पाेलिसांच्या हाती ताे लागत नव्हता. गायकवाड साठफुटी रोडवरील चौकात थांबला असल्याची माहिती खबऱ्याने दिली. याच्या आधारे स्थागुशाच्या पथकाने विजय बब्रुवान गायकवाड (वय ४३, रा. बौद्धनगर, लातूर) याला अटक केली.
विविध पाेलिस ठाण्यात दाखल आहेत गंभीर गुन्हे...अटकेतील आराेपीवर लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात मारामारी, खुनाचा प्रयत्न, चोरीसारखे गुन्हे दाखल असून, ताे पाेलिसांच्या रेकाॅर्डवर सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोउपनि. काळगे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, तुराब पठाण, राजू मस्के, संतोष खांडेकर, नितीन कटारे, प्रदीप चोपणे यांच्या पथकाने केली आहे.