जळकोट : तालुक्यातील जिरगा मोड ते रावणकोळा या चौदा किमी रस्त्याची दुरवस्था झाली असून, रस्त्याच्या कामाला तीन महिन्यांपूर्वीच मंजूरी मिळाली आहे. त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असून, केवळ कार्यारंभ आदेश नसल्याने काम सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागत आहे.
जळकोट तालुक्यातील जिरगा ते रावणकोळा रस्त्यावर कुणकी, हळद वाढवणा, रावणकोळा, विरार ही गावे आहेत. अनेक दिवसांपासून या गावातील ग्रामस्थांची रस्त्याची मागणी होती. त्यानुसार क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी पाठपुरावा करत रस्त्याच्या कामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. मात्र, कार्यारंभ आदेश नसल्याने तीन महिन्यांपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
जिरगा ते रावणकोळा या १४ किमी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले असून, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कार्यारंभ आदेश देऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी जळकोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथप्पा किडे, शहराध्यक्ष अशोक डांगे, गटनेते तात्या पाटील, खादर लाटवाले, संतोष तिडके, चंदन पाटील, अजिज मिस्त्री, संदीप डांगे, गोविंद ब्रमन्ना, सरपंच ज्योत्स्ना पाटील, सत्यवान पाटील दळवे, सत्यवान पांडे, सत्यवान पाटील चव्हाण, ज्ञानेश्वर भोपळे, विनायक डांगे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारूती पांडे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टी, संग्राम कदम, प्रा. गजेंद्र किडे आदींनी केली आहे.
लवकरच कामाला सुरुवात होणार...जिरगा ते रावणकोळा रस्त्यासाठी १७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, १८ फूट रुंदीचा रस्ता होणार आहे. कार्यारंभ आदेश तयार असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे उपअभियंता मुकदम यांनी सांगितले. याशिवाय वांजरवाडा ते जळकोट हा साडेचार किमी अंतराचा रस्ता व जळकोट ते हिप्परगा या तीन किमी अंतराच्या रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात येईल, असेही उपअभियंता मुकदम यांनी सांगितले.