बीएसएफ जवान बलभीम कांबळे यांच्या पार्थिवदेहावर दिल्लीतच अंतिम संस्कार
दुःखद अंत:करणाने वेळा अमावास्या दिवशी अखेरचा निरोप
किनगांव : कोपरा येथील बीएसएफ जवान बलभीम कांबळे हे राजस्थान गंगानगर येथील पाक बॉर्डरवर बीएसएफमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत होते. सुट्टी घेऊन ते गावाकडे येत होते. मात्र, दिल्ली रेल्वे स्थानकावर हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. सोबतचे जवान विजय जोंधळे यांनी दिल्लीतील सरकारी लेडी हार्डली रुग्णालयात घेऊन जाईपर्यंत त्यांचे आकस्मिक निधन शनिवारी (दि. ९ जानेवारी) झाले. त्याच्या निधनाची वार्ता समजताच गावावर शोककळा पसरली.
देशाच्या विविध भागामध्ये अठरा वर्षे राष्ट्रसेवा केलेल्या जवानाचे अंत्यसंस्कार आता दिल्लीतच होणार हे ऐकून आई- वडील, पत्नी, मुलांनी आणि गावकऱ्यांनी टाहो फोडला. अश्रुनयनांचा जणू कोपरा गावात पाट वाहिला. जवान कांबळे यांचा पार्थिवदेह गावाकडे आणण्यासाठी हालचाली सुरू असताना बीएसएफ कार्यालयाने नातेवाइकांना दिल्लीला येण्याचे कळविले. त्यानुसार जवान बलभीम कांबळे यांची पत्नी अनुजा, भाऊ राहुल, मावसभाऊ सारीपुत्र ढवळे आणि मेहुणा सत्यजित कांबळे दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये जवान कांबळे यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आमच्या या जवानाला दिल्लीच्या लेडी हार्डली रुग्णालयातच कसा कोरोनाचा संसर्ग झाला याचा प्रश्न पडला आहे. गावाकडे सुट्टीवर येताना कोरोना टेस्ट झाली नव्हती का? अचानक जवान कोरोना पॉझिटिव्ह कसा काय ही भावना नातेवाइकांना व्यक्त केली.