काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तो राेखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ७६७ कोरोनाबाधित आढळले आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार २५ आहेत, तर ७८ जण मृत झाले आहेत. दरम्यान, अहमदपूर पालिकेच्यावतीने कोरोनामुळे दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी बाहेरगावी मृत झालेल्या आणि प्रशासनाने परवानगी दिलेल्या ११ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. हे अंत्यसंस्कार सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये केले जातात. त्यासाठी आवश्यक असणारी इंधन लाकडे, शववाहिका नगरपरिषद उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी पुढाकार घेऊन सर्व सोपस्कार पार पाडत आहेत. अग्नी देण्याचे कामही पालिकेचे कर्मचारी करीत आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या शववाहिकेचे भाडेही नगरपरिषद अदा करीत आहे.
अंत्यसंस्कारासाठी माधव पानपट्टी, प्रकाश जाधव, अजित लाडे, प्रशांत गायकवाड, कैलास सोनकांबळे, आदी कर्मचारी पीपीई कीट घालून सर्व सोपस्कार पार पाडत आहेत.
रोकडेश्वर भजनी मंडळाकडून शववाहिका...
आतापर्यंत खासगी शववाहिकेद्वारे स्मशानभूमीकडे मृतदेह घेऊन जावा लागत होता. त्यासाठी भाडे द्यावे लागत आहे. दरम्यान, रोकडेश्वर भजनी मंडळाचे अशोक केंद्रे, जुगल शर्मा, विजय पुणे, आदींनी सामाजिक बांधीलकी म्हणून मोफत शववाहिका देण्याचे मान्य केले. पीपीई कीट आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिल्यास खर्च कमी होणार असल्याचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.