राजकुमार जाेंधळे / लातूर : जिल्ह्यातील गाेठेवाडी (ता. औसा) येथील दुहेरी खून खटल्यातील दाेषी आराेपीला प्रमुख लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी जन्मठेप आणि पाच हजाराचा दंड अशी शिक्षा मंगळवारी सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १६ जणांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
आराेपी राजू उर्फ त्र्यंबक गुरुसिद्ध नारायणकर हा मुंबई येथे राहत हाेता. त्यांची सासू शेवंताबाई ज्याेतीराम सावळकर आणि शेवंताबाईची बहीण त्रिवेणाबाई सगण साेनवणे या दाेघी गाेठेवाडी येथील शेतात वास्तव्यास हाेत्या. दरम्यान, आराेपी राजूची गाेठेवाडी शिवारातच शेतजमीन हाेती. काेराेना काळात लाॅकडाऊनमध्ये आराेपी हा शेती करण्यासाठी मुंबई येथून गाेठेवाडीत आला. त्याची सासू शेवंताबाई आणि त्रिवेणाबाई यांना त्यांची शेती माझ्या नावावर करून द्या, असे वारंवार म्हणत हाेता. मात्र, शेती नावावर करून देत नसल्याने आराेपी राजू नारायणकर याने त्रिवेणाबाईला भिंतीला धडकावून आणि शेवंताबाईचा गळा, नाक, ताेंड दाबून ठार मारले. शेवंताबाईचा मृतदेह पूर्ण एका पाेत्यात भरून आणि त्रिवेणाबाईचा मृतदेह कत्तीने कमरेपासून दाेन तुकडे करून शरीराचा कमरेखालील भाग एका पाेत्यात भरून कमरेपासून वरील भाग एका पाेत्यात भरला. मृतदेहाचे तीनही पाेते शेततळ्यात गाय पुरलेल्या ठिकाणाजवळ पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
किल्लारी पाेलिसांनी केला गुन्ह्याचा तपास...
याबाबत मयत त्रिवेणाबाईची मुलगी शालूबाई श्रीपती त्रिमुखे यांनी हरवल्याची तक्रार किल्लारी पाेलिसांत दिली. दरम्यान, मयत त्रिवेणाबाईचा मुलगा नवनाथ साेनवणे यांनी किल्लारी पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तपासाअंती त्रिवेणाबाई आणि शेवंताबाईचा खून आराेपी राजू याने केल्याचे उघड झाले. याप्रकरणी कलम ३०२ भादंविप्रमाणे सहायक पाेलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तपास केला. न्यायलयात दाेषाराेपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील विठ्ठल देशपांडे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. परमेश्वर तल्लेवाड यांनी सहकार्य केले. काेर्ट पैरवी अधिकारी पाेलिस नाईक पंढरीनाथ साेमवंशी यांनी केली.
फाेनचे टाॅवर लाेकेशन, डाॅक्टरांची साक्ष म्हत्वपूर्ण...
या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने १६ साक्षीदारांची साक्ष झाली. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे, सरकार पक्षाने साक्ष-पुराव्याची साखळी सिद्ध केली. या प्रकरणात आराेपीच्या फाेनचे टाॅवर लाेकेशन, डाॅक्टरांची साक्ष, त्याचबराेबर इतर साक्षीदारांनी पुरावे सिद्ध केले. साक्ष, पुरावे आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आराेपी राजू उर्फ त्र्यंबक गुरुसिद्ध नारायणकर याला कलम ३०२ भादंवि अन्वये जन्मठेप व पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली. कलम २०१ भादंवि अन्वये सात वर्ष सक्तमजुरी, पाच हजारांचा दंड अशी शिक्षा ठाेठावली आहे.