राजकुमार जाेंधळे / औराद शहाजानी (जि. लातूर) : तांबाळा (ता. निलंगा) परिसरातील क्लबवर पाेलिसांनी धाड टाकून चार राज्यांतील जुगाऱ्यांना पकडले. यावेळी २ काेटी २८ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात ७४ जुगाऱ्यांविराेधात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, चाकूर-निलंगा येथील सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना तांबाळा परिसरातील क्लबवर जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. या माहितीची खातरजमा करून त्यांनी आपल्या पथकांसह जुगार अड्ड्यावर माेठा फाैजफाटा घेऊन रविवारी रात्री १ वाजता धाड टाकली. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून राेख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण २ काेटी २८ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवारी दिवसभर पंचनामा आणि मुद्देमालाची माेजदाद सुरु हाेती. दरम्यान, याबाबत औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात एकूण ७४ जणांविराेधात साेमवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.
नियम-अटींचे उल्लंघन; पाेलिसांकडून कारवाई...
तांबाळा शिवारातील एका शेतात परवानाधारक क्लब चालविला जात हाेता. दरम्यान, रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या परवान्यामधील नियम आणि अटीचे उल्लंघन केल्याचे धाडीत आढळून आले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतात तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती खबऱ्याने पाेलिसांना दिली. या माहितीच्या आधारे चाकूर-निलंगा येथील सहायक पाेलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी ७४ जुगारी पाेलिस पथकाच्या जाळ्यात अडकले.