अहमदपूर (जि. लातूर) : शहरातील साठे नगर येथे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर विशेष पोलीस पथकाने बुधवारी दुपारी छापा मारला. यावेळी २ लाख १८ हजार ९८० रुपये रोकड आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दोघे पसार झाले आहेत. याबाबत अहमदपूर पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर - चाकूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या विशेष पथकाला खबऱ्याने माहिती दिली. या माहितीच्या आधारे अहमदपूर शहरातील साठे नगर येथील तिरट नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा मारला. दरम्यान, यावेळी २ लाख १८ हजार ९८० रुपये आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र केदार यांनी दिली.
जुगार खेळत असलेल्या १३ जणांविरोधात बुधवारी सायंकाळी अहमदपूर पोलीस ठाण्यात तुळशीदास रोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी १३ पैकी ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस निरीक्षक चिताबंर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र केदार हे करत आहेत.