लातूर : जिल्ह्यातील हाडोळती शिवारात सुरु असलेल्या जुगारावर पोलिस पथकाने रात्री उशिरा धाड मारली. यावेळी एक जुगारी पळून गेला तर १२ जुगारी जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी, जुगाराचे साहित्य असा ६ लाख ९४ हजार ४६० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत बुधवारी पहाटे अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारात जगळपूर जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एकाच्या शेतात जुगार सुरु असल्याची माहिती खबऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना दिली. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मोहन सुरवसे, संपत फड आणि अहमदपूर येथील ठाण्याचे कर्मचारी आरदवाड, पठ्ठेवाड, गज्जेवाड यांच्यासह इतर काही कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा या जुगारावर अचानक धाड टाकली. यावेळी १३ जण जुगार खेळताना आढळून आले.
दरम्यान, घटनास्थळावरून रोख रक्कम, दुचाकी वाहन, आटो, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ९४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी एक जण पळून गेला असून, बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात बुधवारी पहाटे एकूण १३ जणांविरुद्ध मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.