लातूर : लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना परवाना देताना किमान शंभर वृक्ष लावण्याचे मान्य करून घेण्याबरोबरच गतवर्षी लावलेल्या वृक्षांचे संगोपन केल्याचा पुरावाही घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र नगण्य आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मांजरा, तेरणा नदीच्या दुतर्फा वृक्ष लावण्याची मोहीम राबविली आहे. शाळा-महाविद्यालये व संस्थांचा सहभाग घेऊन ऑगस्ट महिन्यामध्ये नदीपात्राच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आलेली आहे. आता जिल्हाभरातील गणेश मंडळांना वृक्ष लावण्याचे निर्देश दिले आहेत. गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे. मंडळांना परवाना देताना तसे लिहून घेतले जात आहे. शिवाय, गतवर्षी लावलेल्या झाडांचे संगोपन केल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
परवानगी पत्रांवर १०० वृक्षांचे रोपण करण्याची सूचना... पोलीस विभागाने गणेश मंडळांना परवाने देताना मंडळांकडून प्रत्येकी शंभर वृक्षांचे रोपण करून त्यांचे संगोपन करण्याची सूचना परवानगीपत्रावर नमूद करावी. तसेच दरवर्षी परवानगी देताना पूर्वी लावलेल्या किमान शंभर झाडांचे जतन केल्याचा पुरावा घ्यावा, अशी सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केली आहे. वनाच्छादन वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.