लातूर - शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील राधाबाई मारोती गायकवाड (४०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांचा मुलगा गणेश हा दहावीला आहे. आईच्या निधनाचे दु:ख असले तरी दहावीचीपरीक्षा देणे महत्त्वाचे असल्याने त्याने ते दु:ख सहन करीत इंग्रजीचा पेपर दिला.
येरोळ येथील राधाबाई मारोती गायकवाड यांच्यावर लातुरातील रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर पसरला. दरम्यान, त्यांचा मुलगा गणेश हा गावातील जिल्हा परिषद प्रशालेत दहावीची परीक्षा देत आहे. आईचे निधन झाल्याचे समजताच त्याला मोठा धक्का बसला आणि घरात आक्रोश सुरू झाला. दरम्यान, त्याचे वर्गशिक्षक राज निचळे आणि शेख यांनी त्याच्या घरी जाऊन समजूत काढली आणि परीक्षा देण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे गणेशने दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर दिला. तो पेपर देऊन आल्यानंतर सायंकाळी राधाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत राधाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
पेपरहून आल्यानंतर ढसाढसा रडला...परीक्षा देऊन आल्यानंतर गणेशने आईचे पार्थिव पाहिले आणि ढसाढसा रडू लागला. नातेवाइकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, रडून त्याने आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली.