लातूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काहींनी गॅरेजचा धंदा थाटला असून, भररस्त्यावरच वाहने थांबविण्यात येत आहेत. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. आता महामार्गावरील वाहने, अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका, लातूर शहर वाहतूक शाखेने माेहीम हाती घेतली आहे. गत दाेन दिवसांत साडेतीन लाखांचा दंड करण्यात आला असून, ५१९ जणांवर खटले दाखल केले आहेत.
लातूर शहरातून गेलेल्या बाह्यवळण रस्त्यावर नव्याने हाेत असलेल्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दाेन्ही बाजूंनी राजीव गांधी चाैक ते नवीन नांदेड नाका-गरुड चाैकापर्यंत काहींनी गॅरेजचा व्यवसाय रस्त्यावरच थाटला आहेत. त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेली विविध प्रकारची वाहने भररस्त्यावरच थांबविण्यात येत आहेत. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. आता हा अडथळा, अतिक्रमण दूर करण्यासाठी लातूर मनपा, वाहतूक शाखेने पुढकार घेत धडक कारवाई सुरू केली आहे. १ ते ६ जून या काळात माेठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. सूचना केल्यानंतरही राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस राेडवर थांबविण्यात आलेली वाहने हटविण्यात आली नाहीत, अशा ५१९ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर ३ लाख ३० हजार २५० रुपयांचा दंड केला. ही कारवाई पाेलिस निरीक्षक गणेश कदम, पाेउपनि. आवेझ काझी, बाळासाहेब केंद्रे, भीमराव हासुळे, रामदास केंद्रे, लखन मनाळे, श्री. सुरवसे, लिंबराज जानकर, अंबादास गुरव, जगन्नाथ कांदे यांच्या पथकाने केली आहे.
रिंगराेडवरील गॅरेज,हाॅटेलचालकांवर कारवाई...लातुरातील महामार्ग सर्व्हिसराेड, रिंगराेडलगत असलेल्या हाॅटेल्स, गॅरेज, लाॅजचालकांना पाेलिसांनी नाेटिसा बजविल्या आहेत. त्यांच्याकडील वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी. रस्त्यावरच अस्ताव्यस्त, चुकीच्या पद्धतीने वाहने उभी करू नयेत, वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना पाेलिसांनी दिल्या आहेत.
...तर हाेणार माेटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखलगॅरजेचालक, हाॅटेल व्यावसायिक आणि लाॅजचालकांनी वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी, अन्यथा कलम १८८ भादंविप्रमाणे आणि माेटार वाहन कायदा सुधारणा २०१९ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय, बेशिस्तपणे थांबविण्यात आलेल्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. - पाेनि. गणेश कदम, शहर वाहतूक शाखा, लातूर