राजकुमार जोंधळे, लातूर: शहरातील पाच नंबर चाैक ते छत्रपती चाैक दरम्यानच्या रिंगराेडलगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी आग लावली. या आगीने दिवसभर खाडगाव परिसरात धुराचे लाेट पसरले हाेते. दरम्यान, या मार्गावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना धुराच्या लाेटातूनच मार्ग काढवा लागाला. मनपा कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटाेक्यात आणली.
लातूर शहरातील प्रमुख मार्गासह रिंगराेडलगत माेठ्या प्रमाणावर जागाेजागी कचऱ्याचे ढीग असल्याचे चित्र दिसून येत आहे. काहीजण हा कचरा रस्त्यालगत टाकून देत आहेत. हा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने ताे वाऱ्यामुळे रस्त्यावर पसरत असल्याचे चित्र आहे. कचऱ्यात माेठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा समावेश असल्याने प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर पसरत असून, माेकाट पुशधानांच्या पाेटातही ताे जात आहे. खाडगाव परिसरातील रिंगराेडलगत टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला शुक्रवारी अज्ञाताने पेटवून दिले हाेते. या पेटविलेल्या कचऱ्याने दिवसभर या परिसरात धुरांचे लाेट पसरले हाेत. शेवटी काही जाणकार नागरिकांनी हा प्रकार लातूर मनपा प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर मनपाचे दाेन टँकर, अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटाेक्यात आणली.
कचरा टाकणाऱ्यांवर मनपाने कारवाई करावी...
लातुरात प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यालगत, माेकळ्या जागेत कचरा टाकण्याचे प्रकार माेठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यासाठी मनपाच्या वतीने कारवाईची गरज आहे. रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांचा शाेध घेतला पाहिजे. खाडगाव परिसरात रिंगराेडलगत टाकलेल्या प्लास्टिकसह इतर कचाऱ्याला लावलेल्या आगीने माेठ्या प्रमाणात प्रदूषण झाले.- विनाेद लड्डा, नागरिक, लातूर