लातूर : कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून व्यवस्थापन रुळावर येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दररोजचा कचरा उचलला जात नाही. परिणामी, शहरात जिकडेतिकडे कचरा पडलेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून घंटा गाड्यांना तसेच अन्य वाहनांना डिझेललाच पैसे नाहीत. त्यामुळे कचरा संकलन ठप्प झाले आहे. ज्या पेट्रोल पंपावरून वाहनांना डिझेल घेतले जाते. तिथे मोठी थकबाकी झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपा चालकाकडून डिझेल देणे बंद केले आहे. इंधनच नसल्यामुळे वाहने जागेवर थांबून आहेत.
लातूर शहरातील कचरा संकलनासाठी १२१ घंटा गाड्या आहेत. त्यातील ३५ घंटागाड्या इलेक्ट्रिकल आहेत. चार ट्रॅक्टर, दोन टिपर तसेच खाजगी संस्थेचे सहा टिप्पर असे वाहने कचरा व्यवस्थापनासाठी शहरात वापरली जातात. मात्र, या वाहनांना गेल्या तीन- चार दिवसांपासून पेट्रोल पंपाचालकाकडून डिझेल देणे बंद केले आहे. मोठ्या प्रमाणात उधारी थकली आहे. त्यामुळे ही सगळी वाहने डिझेल नसल्यामुळे जागेवर थांबून आहेत.
कचरा संकलनाचे काम करणाऱ्या संस्थेचे बिल थकले...कचरा संकलनाचे काम करणाऱ्या संस्थेचे दोन महिन्यांचे बिल थकले आहे. कचरा संकलन आणि व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेकडेच डिझेल, इंधन, पाण्याची जबाबदारी आहे. मात्र, त्यांनी केलेल्या कामाचे बिल महापालिकेकडे थकले आहे. त्यामुळे संस्थेकडे डिझेल भरायला पैसा नाही. परिणामी, कचरा संकलनाच्या घंटा गाड्या बंद आहेत.
आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही कचरा व्यवस्थापन रुळावर येईना...कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्यामुळे काँग्रेस पक्ष तसेच माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी आंदोलनाचा इशारा मनपा प्रशासनाला दिला होता. आठ दिवसांत कचरा व्यवस्थापनाचा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन उपरोक्त्यांना महापालिका प्रशासनाने दिले आहे. त्यानंतरच कचरा व्यवस्थापन करणाऱ्या वाहनांनाच डिझेल नसल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काँग्रेस पक्षाने कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्यासाठी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन आठ दिवसांची मुदत दिलेली आहे. त्यानंतर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.
कचरा संकलन नियमित होईलमार्च महिन्याचे थकलेले बिल संबंधित संस्थेला देण्यात येत आहे. दुपारनंतर घंटागाड्या चालू होणार आहेत. सध्या इलेक्ट्रिकल वाहने सुरू आहेत. पैशाची अडचण आली होती; परंतु मार्ग निघालेला आहे. आता नियमितपणे घंटागाड्या घरोघरी जाऊन कचरा संकलन करतील. घंटागाडी यंत्रणा दुपारनंतरच पूर्ववत झालेली दिसेल. कचरा संकलन त्यानुसार नियमित होईल.- रमाकांत पिडगे, प्रमुख स्वच्छता निरीक्षक, लातूर महानगरपालिका