लातूर : हॅलाे... हॅलाे...आपका नाम क्या हैं... हम आपका बडा फायदा कर सकते हैं... असे डाॅयलाॅग पेरत...गाेड अवाजांची किमया अनेकांना ऑलाइन घायाळ करत आहे. मधाळ आवाजात बाेलणाऱ्या भामट्यात आता महिलांनीही आघाडी घेतली आहे. फ्राॅड काॅल्स करून ग्रामीण भागातील वयाेवृद्ध, पेन्शनर्स, व्यापारी आणि काही शिक्षितांना लाखाे रुपयांना गंडविणाऱ्या टाेळ्या सक्रीय झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात एका आठवड्यात तब्बल साडेतीन काेटींना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.
सहा दिवसांत सहा ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांची नाेंद झाली असून, ‘गाेडी-गुलाबीचा फंडा, काेट्यवधींना गंडा...’ असाच फसवणुकीचा नवा पॅटर्न आता रूढ हाेत असल्याचे चित्र आहे. या घटना आठवड्यात घडल्या असून, सायबर क्राइमचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे.
अशी झाली फसवणूक...या घटनांनी फुटला घाम...
घटना - १ : सव्वातीन काेटींचा अपहार...लातुरातील एका अर्बन बँकेत कर्मचारी आणि व्यापाऱ्याने संगनमत करत व्यापाऱ्याच्या नावे पैशाचा धनादेश काढला. यातून बँकेतील तब्बल सव्वातीन काेटींचा अपहाराचा प्रकार समाेर आला आहे.
घटना - २ : फाॅर्च्युनरसाठी २० लाखाला गंडा...लातुरातील एकाला फाॅर्च्युनर गाडी कमी किमतीत देता म्हणून, ठाणे येथील दाेघांनी तब्बल २० लाखांना फसविले. यात कमी दामात आणि पैशांची बचत हाेत असल्याच्या आमिषाला तक्रारदार बळी पडला. यातून ही घटना घडली.
घटना - ३ : पेट्राेलपंपासाठी ६१ लाखांना चुना...सीएनजी, पेट्राेलपंप डीलरशिप मंजूर करून देताे म्हणून त्यासाठी वेळाेवेळी ऑनलाइन रक्क्म भरण्यास सांगितले. त्यानंतर पेट्राेलपंपही मंजूर झाला नाही आणि डीलरशिपही मिळाली नाही. यात तब्बल ६१ लाखांवर फसवणूक झाल्याने दाेघांविराेधात गुन्हा दाखल आहे.
घटना - ४ : परस्पर ५० हजार लांबविले...नळेगाव येथील एकाचे कार्ड एमटीएम मशीनमध्ये अडकले. दरम्यान, ते कार्ड दुसऱ्याच्या हाती लागले. त्याने ते कार्ड इतर एटीएम मशीनमध्ये टाकून, पासवर्ड टाकून बँक खात्यातील ५० हजार रुपये परस्पर लांबविले. याबाबत चाकूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना - ५ : गाेड बाेलणाऱ्या महिलेचा झटका...उदगीर तालुक्यातील कल्लूर येथील एका व्यापाऱ्याला वाढवणा पाटी येथे माेबाइलवर महिलेचा फाेन आला. त्यावर क्रेडिट कार्डची लिमीट वाढवायचे आहे, अशी बतावणी करून ओटीपी क्रमांक मागवून घेत १८ हजार क्षणात परस्पर ऑनलाइन काढून घेतले.
घटना - ६ : वृद्धाची सव्वा लाखाला फसवणूक...उदगीर येथील एका वृद्धाला फाेन आला, तुमचे क्रेडिट कार्ड बंद पडले आहे. ते सुरू करायचे आहे, यासाठी माेबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगा. यावर त्याने ताे क्रमांक सांगितला आणि काही क्षणात सव्वा लाख रुपये बँक खात्यातून गायब झाले.