लातूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या अनुदानातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकूल योजना महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येते. परंतु, या योजनेतील घरकुलांसाठी गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून अनुदान मिळाले नाही. त्यामळे १०१३ घरकुलांचे प्रस्ताव अडगळीत पडले आहेत.
२०११ ते २०२१ पर्यंत या योजनेंतर्गत ३९९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. त्यापैकी २१३३ घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. ६८८ घरकुलांचे काम चालू आहे आणि लाभार्थ्यांनी नकार दिल्यामुळे २६ घरकुले रद्द करण्यात आली आहेत. तर ११५२ घरकुलांना निधी नसल्यामुळे काम बंद आहे. गेल्या दीड-पावणेदोन वर्षांपासून निधीच प्राप्त झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी मनपाकडे खेटे मारत असून, निधी कधी मिळेल ? याची विचारणा करीत आहेत.२०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षासाठी १०१३ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावांना ही मंजुरी मिळाली नाही. पूर्वीचे ११५२ घरकुले मंजूर आहेत. परंतु निधीअभावी काम रखडलेले आहे. प्रस्तूत सालासाठी नव्याने पाठविलेले १०१३ घरकुलांचा ही प्रस्ताव धूळखात पडलेला आहे.
दरम्यान, १०१३ घरकुलांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. ११५२ घरकुलांची कामे निधीअभावी थांबलेली आहेत. निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे महानगरपालिकेतून सांगण्यात आले.
अशी आहे रमाई घरकूल योजना...महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागामार्फत अनुदानित अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकूल योजना महापालिकेमार्फत राबविली जाते.या योजनेंतर्गत शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील ज्यांना घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे, अशा लाभधारकास योजनेचा लाभ देण्यात येतो. घर बांधकामासाठी लाभार्थ्याला २.५० लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात येते. घरकुलाचे बांधकाम लाभधारकाने स्वत: करायचे असून, टप्प्या-टप्प्याने अनुदान वितरित करण्यात येते. या अनुदानामध्ये लाभार्थ्याने ३० चौरस मीटरचे शौचालय बांधकाम करणे बंधनकारक आहे